पाचगणी : एक उत्तम विद्यार्थी घडविणे हे शिक्षकांचे काम आहे. त्यांचे उज्ज्वल भविष्य हीच शिक्षकांच्या कार्याची पोचपावती आहे. पुरस्काराचा विचार न करता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी धडपडणाऱ्या शिक्षकांना पाचगणी रोटरी क्लबने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले. रोटरीचे हे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार महाबळेश्वर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी काढले.
पाचगणी (ता.महाबळेश्वर) येथील रोटरी क्लबच्या सभागृहात पाचगणी रोटरी क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी पळसे बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक, साहित्यिक जगन्नाथ शिंदे, पाचगणी रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वप्निल परदेशी, सेक्रेटरी नितीन कासुर्डे, लिट्रसी डिरेक्टर तेजस्विनी भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.
जगन्नाथ शिंदे म्हणाले, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी दुर्गम महाबळेश्वर तालुक्यातील शैक्षणिक दर्जा सुधारला. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. कार्यक्रमाची राष्ट्रगीताने सुरुवात झाली. स्वप्निल परदेशी व नितीन कासुर्डे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
अमृता पोरे, अंकित कळंबे, भूषण बोधे, महेंद्र पांगारे यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला. यावेळी चिमुकल्या पार्थ पांगारे याने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनन यांच्या वेशभूषेत शिक्षकांना अनोख्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात राज्यात चौथी व सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल रांजणी शाळेतील संस्कृती या विद्यार्थिनीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जयवंत भिलारे यांनी केले. तर नितीन भिलारे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी, रोटरीयन मोठ्या संख्येने उपस्थित होते.