-संतोष पवार
पळसदेव : बेरोजगारी आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाकडून मोठी मेगा भरती काढण्यात आली आहे. खरंतर शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. योजनादूत भरती प्रक्रियेद्वारे 50 हजार तरूणांना नोकरीची संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. उमेदवार अधिकृत संकेतस्थळ mahayojanadoot.org वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी 13 सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण 50 हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा 10 हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाचे हे काम केल्यावर याचे एक प्रमाणपत्र सुद्धा दिले जाणार आहे.
या योजनेत काम करण्यासाठी संबंधित उमेदवाराला सरकारने नागरिकांसाठी ज्या काही योजना सुरू केल्या आहेत, त्याची माहिती घरोघरी पोहचवायची आहे. गावातील सर्व व्यक्तींना योजनांचा कशा पद्धतीने लाभ घेता येईल, याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचे आहे. घरोघरी जाऊन लोकांना योजनांची माहिती देण्यापासून त्यांना योजनेचा लाभ मिळेपर्यंत मदत करायची आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार 18 ते 35 वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे स्मार्ट फोन आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे आधार कार्ड, रहिवासी दाखला, पदवी प्रमाणपत्र, संगणक प्रमाणपत्र (MSCIT) इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.