-संतोष पवार
पळसदेव : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) वर्धापन दिनानिमित्त पदवीपूर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेची घोषणा केली आहे. विजेत्या विद्यार्थ्याला बँकेकडून 10 लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. ‘RBI 90 Quiz’ नावाच्या या स्पर्धेत इतिहास, अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी अशा अनेक विषयांमधून सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले जातील. इच्छुक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 17 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.
देशभरात 19 ते 21 सप्टेंबर या काळात ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. rbi90quiz.in/students/register या वेबसाइटवर जाऊन विद्यार्थी नोंदणी करू शकतात. द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्याला 8 लाखांचे रोख पारितोषिक आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्याला 6 लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल. वर नमूद केलेल्या वेबसाइटवर, विद्यार्थी क्विझचा सराव देखील करू शकतात.
देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. उमेदवाराचे वय 1 सप्टेंबर 2024 रोजी 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. म्हणजे उमेदवाराचा जन्म 1 सप्टेंबर 1999 रोजी किंवा त्यानंतर झाला असावा. एका महाविद्यालयातून अनेक संघ सहभागी होऊ शकतात.
महत्वाचे म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेचे कर्मचारी (कंत्राटी कर्मचाऱ्यांसह) आणि त्यांचे कुटुंबीय या स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाहीत. याशिवाय आरबीआय संलग्न एजन्सीचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय देखील या प्रश्नमंजुषामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत.
या प्रश्नमंजुषामध्ये एकूण चार टप्पे असतील. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी 25 सेकंदांचा अवधी मिळेल आणि सर्व प्रश्न MCQ स्वरूपात असतील, म्हणजेच चार पर्यायांमधून एक योग्य उत्तर निवडावे लागेल. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 मार्क मिळेल. चुकीच्या उत्तरांसाठी कोणतेही गुण कापले जाणार नाहीत. दोन किंवा अधिक संघांचे समान गुण असल्यास, RBI 90 क्विझ पूर्ण करण्यासाठी कमीत कमी वेळ घेणाऱ्या संघाला विजेता घोषित केले जाईल.
एखाद्या संघात दृष्टिहीन विद्यार्थी असल्यास, त्यांना लागणारा प्रत्यक्ष वेळ निम्मा होईल. यानंतरही बरोबरी राहिल्यास, RBI 90 प्रश्नमंजुषामध्ये बरोबर उत्तर दिलेल्या कठीण प्रश्नांच्या संख्येवर आधारित निर्णय घेतला जाईल. तरीही बरोबरी राहिल्यास, RBI 90 क्विझमधील कठीण प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल.