Rajgurunagar News : राजगुरुनगर : शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढण्याचा प्रकार येथील केटीईएस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडला. याबाबत पालकांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात शाळेकडे विचारणा केल्यानंतर शाळेने विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याची परवानगी दिली.
वादावादीनंतर सर्वांना वर्गात बसण्याची परवानगी
उन्हाळ्याची दीर्घ सुटी संपल्यानंतर गुरुवारी (ता. १५ जून) शाळा सुरू झाल्या. पहिल्याच दिवशी परिसरातील इतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प, वह्या-पुस्तके देऊन बँडच्या तालावर मोठ्या उत्साहात करण्यात आले. (Rajgurunagar News) मात्र, केटीईएस शाळेत पहिल्याच दिवशी शुल्क न भरल्याचे कारण देत काही विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढण्यात आले.
या शाळेत सुमारे सातशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गुरुवारी विद्यार्थी शाळेत आल्यानंतर शुल्क भरलेले आणि न भरलेले अशी वर्गवारी करण्यात आली. शुल्क भरणाऱ्यांना वर्गात बसू दिले. शुल्क न भरलेल्यांना वर्गाबाहेर काढण्यात आले. वर्गाबाहेर काढलेले काही विद्यार्थी घरी गेले, तर काही शाळेच्या व्हरांड्यात बसून राहिले.(Rajgurunagar News) या प्रकारामुळे मुलांना धक्का बसला. हा प्रकार मनसेचे सोपान डुंबरे, नितीन ताठे यांना समजल्यानंतर त्यांनी पत्रकारांना बोलावून याबाबत माहिती दिली. वादावादीनंतर शाळेने सर्वांना वर्गात बसण्याची परवानगी दिली. मात्र, घडलेल्या प्रकाराबाबत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या प्रकाराबाबत बोलताना पालक रूपेश कहाणे म्हणाले की, माझी दोन मुले या शाळेत आहेत. दोघांची एकूण फी ४४ हजार रुपये मी एकदम भरू शकत नाही. ती दोन टप्प्यांत भरण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती मी संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर व मुख्यध्यापकांकडे केली होती. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मुलांना शाळेच्या पहिल्याच दिवशी नाराज केले.
प्रवेशानंतर पालक फी भरत नाहीत. त्यामुळे संस्थेने प्रवेशापूर्वी फी भरण्याचा नियम केला आहे. पालकांना तसे मेसेज पाठवून १३ जूनपूर्वी फी भरल्यासच प्रवेश दिला जाईल, असे कळवले होते. (Rajgurunagar News) मात्र, त्यानंतरही काही पालकांनी फी न भरल्याने त्यांच्या मुलांना प्रवेश दिला नाही. या संदर्भात पालकांशी बोलून मार्ग काढू, अशी प्रतिक्रीया संचालक व इंग्रजी माध्यम शाळाप्रमुख डॉ. प्रदीप शेवाळे यांनी व्यक्त केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Rajgurunagar News : अंगावर वीज कोसळून चास येथील ७० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू..!
Sad News : काळाचा घाला! वीज पडून अख्ख कुटुंबच संपलं; गडचिरोली जिल्ह्यातील घटना…!