Pune News : पुणे : पुणे जिल्हा परिसरातील घाट माथ्यावर पडणाऱ्या संततधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातील दुर्गम भागातील शाळा आज आणि उद्या दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशाअंतर्गत आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, पुरंदर, मुळशी, मावळ या तालुक्यांतील अवघड क्षेत्रातील ३५५ शाळा आज आणि उद्या बंद राहणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!
राज्यात अनेक भागांत पावसाने थैमान घातले आहेत. घाट परिसरात दरडी कोसळण्याचा धोका आहे. सततच्या पावसामुळे रस्ते, पूल खचले असून, वाहन अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पर्यटनस्थळांवर जाणे टाळावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. (Pune News ) संततधार पावसामुळे रायगडमधील इशाळवाडी गावावर दरड कोसळली असून, संपूर्ण गाव मातीच्या ढीगाऱ्याखाली अडकले आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हादंडाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी काल रात्री घाट भागात झालेल्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज (ता. २० जुलै) आणि उद्या (ता. २१ जुलै) रोजी दुर्गम भागात असलेल्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या भागातील अंगणवाड्याही आज आणि उद्या बंद ठेवल्या जाणार आहेत.
शाळा बंद ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद, सर्व मंडळांशी संलग्न अनुदानित व खासगी शाळांना लागू आहे. (Pune News ) इतर सर्व भागांतील शाळा आणि अंगणवाड्या चालू राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, शिक्षक आणि मुख्याध्यापक शाळेत उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून, अवघड क्षेत्रातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा अंदाज घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. (Pune News ) प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : तुम्हालाही भारत सरकारचा मेसेज आला का? घाबरू नका, जाणून घ्या कारण..