उस्मानाबाद : कर्तबगार मुलगा हृदयविकाराच्या झटक्याने गेल्यामुळे हताश झालेले वडिल मजुरी करून जमा झालेली मजुरी लहान मुलांच्या शिक्षणासाठी देत आहेत. मागील ६ वर्षापासून हा उपक्रम अविरतपणे सुरु आहे.
आत्माराम सोनवणे (वय-६५ रा. खामसवाडी, ता. कळंब जि. उस्मानाबाद असे या दिलदार मजुरी करणाऱ्या वडिलांचे नाव आहे. तर त्यांचा गोपाळ नावाचा मुलगा ७ एप्रिल २०१६ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मयत झाला.
तो उस्मानाबाद जिल्हा न्यायालयात शिपाई पदावर कार्यरत होता. एम.ए.बी.एड एवढे शिक्षण झाल्यामुळे गोपाळ सोनवणे हे UPSC, MPSC अशा परीक्षा नेहमी देत. जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न गोपाळ यांनी पाहिले होते. मात्र, नियतीने धोका दिल्यामुळे गोपाळ यांचे स्वप्न अपूर्ण राहिले.
मुलाने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आत्माराम सोनवणे हे पत्नीसह मजुरी करतात. वर्षभर जमा झालेली मजुरी ते शाळेतील विदयार्थीसाठी खर्च करतात. ही रक्कम ते पुस्तके, वही, बसायला बेंच बनवून देण्यावर खर्च करतात. शिवाय ७ एप्रिल रोजी गोपाळ यांची पुण्यतिथी असते. या दिवशी ते ५००/१००० विदयार्थ्यांना जेवण देतात.
दरम्यान, मुलाचे स्वप्न होते जिल्हाधिकारी व्हायचे, पण ते पूर्ण झाले नाही. पण यातला १ जरी विदयार्थी जिल्हाधिकारी झाला तर माझे स्वप्न पूर्ण होईल, असे आत्माराम सोनवणे यांनी म्हटले आहे.