पुणे : विद्यार्थी व शिक्षक यांचे नातेसंबंध अधिक समृद्ध, सहज व स्नेहपूर्ण व्हावे यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व शिक्षिकांना ‘मॅडम’ असे संबोधन न वापरता त्याऐवजी ‘ताई किंवा माई’ असे संबोधन वापरण्यात यावे, तसेच उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना बाजी असे संबोधन वापरण्यात यावे असा आदेश लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व पंचायत समितीला दिला आहे.
दिलेल्या निवेदनानुसार, उपरोक्त विषयी सुचित करण्यात येते की, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्रत्येक मुल शिकले पाहीजे यासाठी विशेष कार्ययोजना आखुन त्याद्वारे प्रयत्न केले जात आहेत. पुर्नरचित अभ्यासक्रमानुसार प्रत्येक शिक्षक सुलभक म्हणुन कार्यरत आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील नातेसंबंधाचा सकारात्मक परिणाम मुलांच्या शिकण्यावर होतो. याचाच विचार करून शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते जेवढे सहज आणि स्नेहपूर्ण राहील तेवढे मुलांचे शिकणे दर्जेदार आणि आनंददायी होण्यास मदत होईल.
लातूर जिल्ह्यातील सर्व शिक्षिकांना मॅडम असे संबोधन न वापरता त्याऐवजी ताई किंवा माई असे संबोधन वापरण्यात यावे तसेच उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना बाजी असे असे संबोधन वापरण्यात यावे अशी विनंती करण्यात येत आहे. शाळेत दाखल झाल्यापासून विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतील शिक्षिकांसाठी मॅडम हे संबोधन वापरण्याची सवय असते.
याबाबीचा विचार करता ताई किंवा माई हे नवीन संबोधन सुरूवातीला वापरणे विद्यार्थ्यांना थोडेशे जड जाण्याची शक्यता आहे. तरी याबाबत विद्यार्थ्यांना कोणतीही सक्ती अथवा दडपशाही करू नये. विद्यार्थ्यांना समजुन घेवून प्रेमाणे सदरील ताई किंवा माई हे संबोधन वापरण्यासाठी प्रवृत्त करावे. हळुहळु विद्यार्थ्यांना याची सवय होऊन ते नियमित याचा वापर करतील. याबाबत पालकांना देखील विश्वासात घ्यावे. विद्यार्थी व शिक्षक यांचे नातेसंबंध अधिक समृद्ध, सहज व स्नेहपूर्ण करून आपला जिल्हा १०० टक्के प्रगत करण्याच्या कार्यास्तव आपणा सर्वांना शुभकामना असे निवेदनात म्हटले आहे.