-संतोष पवार
पळसदेव : राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा अर्थात एनएमएमएस परीक्षा (NMMS EXAM) अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून विद्यार्थी येत्या 4 नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरू शकतात. येत्या 22 डिसेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षेचा निकाल फेब्रुवारी महिन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे.
इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना एनएमएमएस परीक्षा देता येते. या शिष्यवृत्तीसाठी लेखी परीक्षेमधून निवड करण्यात येते. बौद्धिक क्षमता चाचणी, शालेय क्षमता चाचणी अशा दोन विषयांचा परीक्षेत समावेश असतो. विद्यार्थ्यांना एनएमएमएस परीक्षा आठ माध्यमातून देता येते. वार्षिक उत्पन्न साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांची मुले या परीक्षेसाठी पात्र असतात. एनएमएमएस परीक्षेतून शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते.
विद्यार्थ्यांना एनएमएमएस परीक्षेचा अर्ज नियमित शुल्कासह 4 नोव्हेंबरपर्यंत, विलंब शुल्कासह 5 ते 9 नोव्हेंबरदरम्यान, तर अतिविलंब शुल्कासह 10 ते 14 नोव्हेंबरदरम्यान भरता येणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेमार्फत अर्ज करण्याची प्रक्रिया https://www.mscepune.in/ आणि http://mscenmms.in या संकेतस्थळाद्वारे करता येणार आहे.