-संतोष पवार
पळसदेव (पुणे) : शिक्षण मंत्रालयाने शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी ‘नॅशनल मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप स्कीम’साठी NMMSS राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल NSP वर अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. आता नोंदणीची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र विद्यार्थी https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
ही योजना राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारांद्वारे घेतलेल्या पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी एक लाख नवीन शिष्यवृत्ती देते. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कामगिरीच्या आधारे इयत्ता 10वी ते 12वी पर्यंत शिष्यवृत्ती चालू राहते.
ही योजना केवळ राज्य सरकार, सरकारी अनुदानित आणि स्थानिक संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. शिष्यवृत्तीची रक्कम प्रति विद्यार्थी प्रति वर्ष 12,000 रुपये आहे. या शिष्यवृत्तीसाठी 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत एकूण 84,606 नवीन अर्ज आणि 1,58,312 नूतनीकरण अर्ज सादर करण्यात आले आहेत.
NSP पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्जांची पडताळणी दोन स्तरांवर केली जाते. पहिला स्तर (L1) इन्स्टिट्यूट नोडल ऑफिसर (INO) द्वारे केला जातो, तर दुसरा स्तर (L2) जिल्हा नोडल ऑफिसर (DNO) द्वारे केला जातो. INO पडताळणी (L1) साठी अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2024 आहे आणि DNO पडताळणी (L2) साठी अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.