नवी दिल्ली: देशाच्या राज्यघटनेत ज्याप्रमाणे आहे, त्याचप्रमाणे एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ‘भारत’ आणि ‘इंडिया’ या दोन्ही शब्दांचा वापर केला जाईल, असे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एनसीईआरटी) संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी स्पष्ट केले. देशाचा उल्लेख भारत हवा की इंडिया, यावरून सुरू असलेला वाद निरर्थक असल्याचेही ते म्हणाले.
समाजशास्त्र अभ्यासक्रमावर काम करणाऱ्या एका उच्चस्तरीय समितीने सर्व वर्गाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ शब्द वापरण्याची शिफारस केलेली असताना सकलानी यांनी केलेले वक्तव्य हे महत्त्वाचे मानले जाते. राज्यघटनेत जे आहे, तीच आमची भूमिका असून त्यावर आम्ही ठाम आहोत. आम्ही भारताचा तथा इंडियाचा उपयोग करू शकतो. यात समस्या काय आहे? आम्हाला या चर्चेत पडायचे नसल्याचे सकलानी म्हणाले. पुस्तकात ज्या ठिकाणी आम्हाला ‘इंडिया’ योग्य वाटेल त्या ठिकाणी तो शब्द वापरला जाईल आणि ज्या ठिकाणी भारत योग्य वाटेल त्या ठिकाणी तो शब्द उपयोगात आणला जाईल, असे सकलानी यांनी स्पष्ट केले.
दोन्ही शब्दांचा वापर आमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये अगोदरपासून केला जात आहे. नवीन पाठ्यपुस्तकांमध्ये देखील तो कायम राहील, असे ते म्हणाले. पाठ्यपुस्तकांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी एनसीईआरटीकडून स्थापना करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने गतवर्षी सर्व शालेय पुस्तकांमध्ये ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ शब्दाचा वापर करण्याची शिफारस केल्याने वादंग उठले होते. देशासाठी भारत शब्द योग्य असल्याचे सांगत समितीने प्राचीन ग्रंथामधील या नावाच्या उल्लेखाचा हवाला दिला होता. तर मोदी सरकारनेदेखील गतवर्षी जी-२० चे निमंत्रण पाठवताना ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ नावाने पाठवल्याने राजकीय वातावरण तापले होते. यावरून विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य देखील केले होते.