लोणी काळभोर, (पुणे) : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी कोल्हापूर येथील संजय घोडावत युनिवर्सिटी आयकॉन २०२३ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संजय घोडावत विद्यापीठ आयकॉन हा पुरस्कार दरवर्षी कला, शिक्षण, क्रीडा, साहित्य, संस्कृती, कृषी, उद्योग, वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या नेतृत्वाला देण्यात येतो. यंदाचा शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रा. डॉ. मंगेश कराड यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाला प्रेरणादायी, दिशादर्शक असे व्यक्तिमत्व डॉ. मंगेश कराड यांचे आहे. जागतिक स्तरावरील मुल्यात्मक शिक्षण भारतीय विद्यार्थ्यांना भारतातच उपलब्ध व्हावे आणि भारतीय विद्यापीठ ही जागतिक स्तरावरील उच्च शिक्षण प्रदान करणारी दालन व्हावी, अशी भूमिका नेहमी डॉ. मंगेश कराड यांची असते. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून संजय घोडावत विद्यापीठ आयकॉन २०२३ हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
दरम्यान, यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. सुनिता कराड यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एस जी यु आयकॉन २०२३ पुरस्कार मिळाल्याने एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांचे अभिनंदन केले