विशाल कदम
(Jinti )जिंती : अलीकडच्या काळात वाढदिवस साजरा करणे हा खूप मोठा इव्हेंट झाला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने खूप मोठा खर्चही केला जातो. परंतु, जिंती (ता. करमाळा) येथील परिवर्तन सार्वजनिक वाचनालयाने दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून जिंती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आज मंगळवारी (ता.११) शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले आहे.
यावेळी परिवर्तन सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच प्रा. धर्मेंद्र धेंडे, जिंती येथील जिल्हा परिषद शाळेचे केंद्रिय मुख्याध्यापक संतोष जगताप, निळकंठ शेळके, अविनाश नेवसे, करुणा धेंडे, मालन गायकवाड, संदीप पाटील, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. धर्मेंद्र धेंडे म्हणाले की…!
”वाढदिवस साजरा करताना नागरिक विनाकारण अवाढव्य खर्च करत असतात. हा अनावश्यक खर्च टाळून आपण समाजासाठी काही तरी देणे असते. या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम परिवर्तन सार्वजनिक वाचनालयाने राबविला आहे.”
दरम्यान, जिंती येथील परिवर्तन सार्वजनिक वाचनालयाचे प्रा. रामदास झोळ यांच्या वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य व खाऊ वाटप करून माणूसकी जपली आहे. हा सामाजिक उपक्रम राबवून या वाचनालयाने समाजासाठी एक आदर्श निर्माण केला आहे. तर या उपक्रमाचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.