विशाल कदम
जिंती : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्धांच्या पंचशीलाच्या माध्यमातून जगाला स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाची शिकवण दिली. या शिकवणीच्या आधारवर भारतीय संविधानाची निर्मिती झाल्यामुळे आज भारतीय संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ संविधान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मुख्याध्यापक संतोष जगताप यांनी केले.
जिंती (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद शाळेत आज शनिवारी (ता.२६) संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षक निळकंठ शेळके, अविनाश नेवसे, शिवाजी काकडे, श्रीकांत मोरे, अंगणवाडी सेविका लक्ष्मी भोसले, मंदाकिनी भोसले, विद्या काळे, मालन गायकवाड, वंदना चिंचकर, रूपाली धेंडे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना संतोष जगताप म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती २९ ऑगस्ट १९४७ रोजी स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना, त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला जातो.
यावेळी बोलताना शिवाजी काकडे म्हणाले, भारतीय संविधान आहे म्हणून माणूस योग्यरीतीने पाऊल टाकत आहे. संविधानाने दिलेले हक्क, अधिकार व कर्तव्य याची जपणूक होत असल्यामुळे माणूस यशस्वीरित्या जगत आहे. त्यामुळे सर्वांनी संविधानाचा सन्मान केला पाहिजे. आणि संविधानाची मुल्ये सर्वांनी जपणे ही काळाची गरज आहे.