लोणी काळभोर : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा लोणी काळभोर (ता.हवेली) येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून सोमवारी (ता.१५) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर क्रीडा शिक्षक निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्कुलच्या आर एस पी ट्रूप च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक परेड सादर करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. परेड संपन्न झाल्यावर संगीत शिक्षक प्रियांका जाधव व साने सर यांनी तालबद्ध केलेल्या व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अप्रतिम स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष नितीन काळभोर, सचीव राजेश काळभोर, विश्वस्त मनीषा काळभोर, मंदाकिनी काळभोर, ऐश्वर्या काळभोर आणि प्राचार्या मिनल बंडगर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी धनंजय मदने म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळणे ही तेवढेच गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यामुळे पालकांनी खेळाकडे दुर्लक्ष करू नये. तर विद्यार्थ्यांनी देशासाठी पदक जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
दरम्यान, प्रीती कदम व सीमा शेळके या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उपस्थितांच्या नजरा खिळवून ठेवणारे अप्रतिम हुमन पिरॅमिड सादर केले. यावेळी भारतमातेची वेशभूषा साकारणाऱ्या स्वरा काळभोर व ओवी कदम या दोन चिमुरड्या मुलींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सर्व शिक्षकांनी मिळून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना क्रमबद्धपणे उभे करून भारताचा नकाशा व त्यामध्ये ७५ अंक अप्रतिमपणे साकारण्यात आला. तर कला शिक्षक दिपक शितोळे यांनी रांगोळीमध्ये महात्मा गांधींच्या साकारलेल्या हुबेहूब प्रतिमेने उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम गीताने करण्यात आली. कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख पायल बोळे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांज जाधव व मनस्वी काळभोर या विद्यार्थिनींनी केले तर आभार विद्यार्थिनी वैष्णवी सुरवसे हिने मानले.