पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षा २०२२ मध्ये आणखी ३४० पदांची भर पडली आहे. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक अशा पदांचा त्यात समावेश असून, २१ ऑगस्टला राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ राज्यभरातील केंद्रांवर परीक्षा होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
राज्यसेवा २०२२ च्या जाहिरातीमध्ये केवळ १६१ पदेच असल्याने स्पर्धा परीक्षार्थीकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता गट अ आणि गट ब संवर्गाची मिळून ३४० पदे वाढल्याने एकूण ५०१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल. एमपीएससीतर्फे ११ मे रोजी राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०२२ ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात १६१ पदांचा समावेश होता. मात्र, शासनाकडून आता अन्य पदांची मागणीपत्रे एमपीएससीला देण्यात आल्याने ही पदे राज्यसेवा २०२२ च्या पदभरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
वाढलेली पदे
उपजिल्हाधिकारी गट अ संवर्गाची ३३, पोलीस उपअधीक्षक गट अ संवर्गाची ४१, सहायक राज्यकर आयुक्त गट अ संवर्गाची ४७, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट अ संवर्गाची १४, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ संवर्गाची दोन, शिक्षणाधिकारी गट अ संवर्गाची २०, प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी) गट अ संवर्गाची सहा, तहसीलदार गट अ संवर्गाची २५, सहायक गट विकास अधिकारी गट ब संवर्गाची ८०, उपअधीक्षक भूमी अभिलेख गट ब संवर्गाची तीन, सहायक निबंधक सहकारी संस्था गट ब संवर्गाची दोन, उपशिक्षणाधिकारी गट ब संवर्गाची २५, सहायक प्रकल्प अधिकारी गट ब संवर्गाची ४२ पदांचा समावेश असल्याचे एमपीएससीने नमूद केले.