लोणी काळभोर, (पुणे) : सध्याच्या परिस्थितीत भारताची प्रतिमा जगात महसत्ता म्हणून निर्माण होत असून देशाच्या स्वतंत्र्यांच्या शंभर वर्षात म्हणजे २०४७ पर्यंत भारत महासत्ता म्हणून उदयास येईल. त्यावेळी जगातील प्रत्येक देश भारताकडे महासत्ता म्हणून बघेल, असे प्रतिपादन प्रशासकिय विभाग साऊथ कमांड मेजर जनरल योगेश चौधरी यांनी केले.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नालॉजी विद्यापीठ यांच्यातर्फे १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित पाचवा “पर्सोना टेक्नो कल्चरल फेस्ट २०२३” च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी मेजर जनरल योगेश चौधरी आणि पद्मश्री मधुर भांडारकर यांना पर्सोना ऑफ द ईअर अवॉर्ड २०२३ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एमआयटी विश्वशांती संगीत कला अकादमी, फाईऩ आर्ट आणि इतर विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतपर नृत्यकला सादर केली.
यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक व लेखक पद्मश्री मधुर भांडारकर, प्रसिद्ध कलाकार आरोह वेलंकर, कॉसमॉस ग्लोबलच्या पुजा शुक्ला, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी मिटकॉमच्या संचालिका प्रा. सुनीता कराड, प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, एमआयटी संगीत कला अकादमीचे आदिनाथ मंगेशकर, पर्सोना आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. रजनीश कौर बेदी, डॉ. विरेंद्र शेटे, डॉ. नचिकेत ठाकुर यांच्यासह विविध आदी मान्यवर उपस्थित होते.
मेजर जनरल योगेश चौधरी म्हणाले, देशाच्या विकासासाठी विद्यार्थ्यांना आपला वाटा उचलावा. युवक हा देशाचा भविष्य असतो, त्यामुळे त्यांच्या स्वप्नांना पंख देण्याचे वातावरण एमआयटी एडीटी विद्यापीठात आहे. जागतिक स्तरावर भारत सध्याला शक्तीशाली देश म्हणून नावारुपाला आला आहे.
युवकांनी स्वप्न बघावे आणि त्याला पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी. भारतीय सैन्य बळ आज जगात मजबूत आहे. आम्ही जगात शांतता नांदावी म्हणून कार्य करत आहोत. भारतीय सैन्य दल भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेहमीच अग्रेसर असते.
पद्मश्री मधुर भांडारकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी कोणतीही गोष्ट करताना मेहनत आणि सखोल अभ्यास करून केल्यास यश मिळेल. आपल्या अभ्यासक्रमाच्या अभ्यासह आवांतर वाचन, लेखन अधिक करावे. स्वत:वर विश्वास असावा. ध्येपूर्तीसाठी मेहनत करत रहावे.
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, भारतीय संस्कृती, तत्वज्ञान आणि परंपराला विसरू नका. पर्सोना म्हणजे आपले व्यक्तिमत्व जगासमोर आणणे होय. सगळ्यांवर जगाला शांतीचा संदेश देण्याची ही जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी सत्य संकल्प करावे. देशाला विश्वगुरू करण्यासाठी आपण सर्वांनी मेहनत करावी.
प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव यांनी प्रस्तावना सादर केली. प्रा. डॉ. अशोक घुगे, स्वप्निल सिरसाट आणि प्रा. स्नेहा वाघटकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विरेंद्र शेटे यांनी आभार मानले.