लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील एका नामांकित महाविद्यालयातील वसतिगृहात मध्यरात्रीच्या सुमारास रोजच मोठ्या प्रमाणात धांगडधिंगा सुरु आहे. मात्र एवढ्या मोठ्या विद्यापीठाची टिमकी मिरवणाऱ्या विद्यापीठात असा प्रकार होत असल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्याकडून लाखो रुपये फी घेऊन कुचकामी यंत्रणा व विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवणारे वॉर्डन, अटेंडन्स, व सुरक्षारक्षक असूनही एवढा धिंगाणा तसेच वसतिगृहात मोठमोठ्याने गाणी वाजवून वाढदिवस साजरे करणे, पार्ट्या करणे सुरु असल्याने नागरिकांनी उपस्थितांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या संकुलात व बाहेर महाविद्यालयाच्या नावाने अनेक वसतिगृह आहेत. या वसतिगृहात मुले धांगडधिंगा करीत आहे. विद्यार्थी चक्क वसतिगृहात “पार्ट्या’ करीत आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास वसतिगृहाची लाईट बंद करतात. त्यानंतर शिट्ट्या, जोरजोरात आरडओरड करून धिंगाणा करतात. याकडे विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. या धिंगाण्यामुळे खरच अभ्यासू करणारे विद्यार्थी त्रस्त झाले असून अशा होत असलेल्या वाढदिवस व पार्ट्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विद्यापीठ प्रशासनाने वसतिगृहाच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षक व मुलांवर देखरेख ठेवण्यासाठी वॉर्डन यांची नेमणूक केली आहे. मात्र, वरील प्रकारामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यापीठाने शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही. याची हमी घेऊन लाखो रुपये फी आकारली आहे. मात्र प्रत्यक्षात मात्र सदर ठिकाणी असलेल्या उपाययोजना या कुचकामी असल्याचे शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गावर याच विद्यापीठातील विविध ठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थी दारू, सिगारेट, गुटखा घेताना, पिताना तसेच धिंगाणा घालताना दिसून येत आहेत. मात्र लोणी काळभोर पोलिसांच्या तेरी भी चूप, मेरी भि चूप मुळे सदर परिसरात राजरोसपणे सुरु असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.