उरुळी कांचन (पुणे) : येथील महादेव कांचन कॉलेज ऑफ फार्मासिटीकल एज्युकेशन अँन्ड रिसर्च संस्थेच्या वतीने जागतिक फार्मसी डे सोमवारी (ता. २६) उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वतीने उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत आरोग्य विषयक नागरीकांचे कर्तव्य, जबाबदारी व जाणीव या संदर्भात जनजागृती फेरी काढून वैद्यकीय शास्राचे महत्व पटवून देण्याचा अभिनव प्रयत्न विद्यार्थ्यांकडून करण्यात आला.
रॅलीतून लोकांमध्ये जनजागृतीसाठी चौका-चौकात औषधांचे दुष्परिणाम, औषधांचे डोस, पेशंट काउन्सिलींग या विषयांवर पथनाट्ये सादर करण्यात आली. फॉर्मसिस्टचे समाजातील कार्य, महत्त्व, औषधी व्यापाराविषयी संकल्पना, इथिकली व्यवसाय कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येत होते. यावेळी विविध सामाजिक उपक्रम हाती घेत शहरात प्रभात फेरी काढून वैद्यकीय शास्त्राचे महत्व पटवून देण्यासाठी प्रबोधन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी मानवी आरोग्य, उपचार पद्धती, काळजी संदर्भात जनजागृती करण्यात आली. आरोग्याच्या समस्येशी सामना करताना अंधश्रद्धे पासून दूर राहण्याचा संदेश देताना प्रत्येक आजारांची जनजागृती पुढील काळात प्रभावीपणे करण्याची जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी शहरातील विविध भागांत स्वच्छता अभियानाद्वारे स्वच्छतेचे महत्व मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष महादेव कांचन यांनी जागतिक फॉर्मसी दिवस का साजरा करण्यात येतो व फॉर्मसिस्टचे समाजातील योगदान काय आहे याची माहिती दिली. यावेळी विश्वस्त प्रतिभा कांचन, कार्यकारी विश्वस्त आप्पा जगदाळे, प्राचार्य विजयकुमार काळे, प्रा. कुणाल हाके, प्रा. रविंद्र होले उपस्थित होते.