मुंबई : राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडणार आहे. तर दहावीच्या परीक्षेसाठी 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 हा कालावधीमध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर, कोल्हापूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत दहावी-बारावीची अंतिम परीक्षा घेण्यात येत असते. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहेत. त्यानुसार यंदा ऑगस्ट महिन्यात दहावी-बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
बारावीच्या परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसर्या आठवड्यात आणि दहावीच्या परीक्षा या मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केल्या जात असतात. संबंधित परीक्षांचा ऑनलाईन निकाल मे अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येत असतो. त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणत जुलैच्या तिसर्या आठवडयापासून घेतली जाते.
विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर पार पडणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे या बाबींचा विचार करता सन 2025 ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी दहावी-बारावीची परीक्षा नेहमीपेक्षा 8 ते 10 दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा हेतू असून त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्याचे राज्य मंडळाकडून सांगण्यात आले आहे.