पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) बोर्ड ऑफ स्टडीजने मे-जून, सप्टेंबर आणि जानेवारी महिन्यात वर्षातून तीनदा सीए परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संस्थेने आता सप्टेंबर २०२४ आणि जानेवारी २०२५ च्या सीए परीक्षांमध्ये बसण्यासाठी फाऊंडेशन आणि इंटरमिडिएट अभ्यासक्रमांमध्ये नावनोंदणीची अंतिम मुदत जाहीर केली आहे.
गेल्या वर्षीपर्यंत तीनही अभ्यासक्रमांच्या सीएच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जात होत्या. मात्र, आता संस्था केवळ सीए अंतिम अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी विद्यमान धोरणाचे पालन करेल, जी मे आणि नोव्हेंबरमध्ये वर्षातून दोनदा घेतली जाईल. नवीन धोरणानुसार ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या महिन्याच्या पहिल्या दिवशी किंवा त्यापूर्वी किमान चार महिन्यांच्या कालावधींसाठी आयसीएआयच्या अभ्यास मंडळामध्ये नोंदणी केली आहे आणि नियम २५ एफमध्ये निर्दिष्ट केलेल्या अटींची पूर्तता केली आहे, ते उमेदवार फाऊंडेशनसाठी उपस्थित राहण्यास पात्र असतील.
पात्रता निकषांनुसार सीए फाऊंडेशन कोर्स नोंदणीसाठी सप्टेंबर २०२४ च्या परीक्षेत बसण्याची अंतिम तारीख १ मे आहे. सीए इंटरमिडिएट अभ्यासक्रमासाठी जानेवारी २०२५ च्या परीक्षेत बसण्यासाठी नोंदणीदेखील १ मे आहे. ज्या विद्यार्थ्यांनी १ जानेवारी २०२४ पर्यंत फाऊंडेशन रुट किंवा थेट इंटरमिडिएट कोर्समध्ये नोंदणी केली आहे. ते सप्टेंबर २०२४ इंटरमिडिएट परीक्षेत बसण्यास पात्र आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट eservices.icai.org द्वारे नोंदणी करण्यास सक्षम असतील. १३ ऑक्टोबर २०२० रोजी अधिकाऱ्यांनी चार्टर्ड अकाऊंटंट रेग्युलेशन १९८८ च्या नियम २५ई, २५एफ आणि २८एफ मध्ये सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर आता उमेदवाराला दहावी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर फाऊंडेशन कोर्ससाठी तात्पुरती नोंदणी करण्याची परवानगी आहे.