पुणे: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. २० मेनंतर कधीही बारावीच्या निकालाची तारीख जाहीर होऊ शकते. तर दहावीचा निकाल मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा १ जूनच्या आसपास लागण्याची शक्यता आहे. राज्यात २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत बारावीची, तर १ मार्च ते २६ मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली. दरवर्षी बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होतो.
यंदा हा निकाल थोडा लवकर म्हणजेच २५ मेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राज्य मंडळाकडून तयारी सुरू आहे. दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतो. यंदा दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जाहीर होणार आहे. बारावी व दहावीच्या परीक्षेतील तोंडी परीक्षेचे गुण ऑनलाइन भरण्यात आल्याने निकालाचे कामकाज लवकर पूर्ण होणार आहे. दहावीच्या निकालानंतर लगेचच अकरावी प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे.