लहू चव्हाण
पाचगणी : हिलरेंजच्या विद्यार्थ्यांमध्ये कलाकौशल्य अधिक असून, यातूनच चांगले कलाकार निर्माण होतील. भविष्यात ते अश्याप्रकारच्या संमेलनाच्या व्यासपीठावर प्रमुख म्हणून आल्यास तो हिलरेंजचा अभिमान असेल असे गौरोउद्गगार प्रसिद्ध अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि चित्रपट लेखक तेजपाल वाघ यांनी केले.
पुस्तकाचे गाव भिलार येथील हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या, हिलरेंज हायस्कुल, हिलरेंज माध्यमिक विद्यालय आणि कै. एम. आर. भिलारे हायस्कूल राजपुरी या शाळांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक विविध गुणदर्शन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, माजी सभापती संजय गायकवाड, हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे, समन्वय समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण भिलारे, भिलारचे सरपंच शिवाजीराव भिलारे, माजी उपनगराध्यक्ष गॅब्रियल फर्नाडिस, राजेंद्र(आबा) भिलारे, किसनशेठ भिलारे, शशिकांत भिलारे, सुनील पार्टे, अमित भिलारे,स्वप्नील परदेशी, अमोल भिलारे,मुराद भाई, किरण जाधव, श्रीकांत वाघमोडे राजेंद्र भगत तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटक, शिवाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक प्रसंग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तर यावेळी लावण्यात आलेल्या खाद्य पदार्थ स्टॉल्सवर खवय्यांची गर्दी झाली होती.
प्रास्ताविक हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका तेजस्विनी भिलारे यांनी केले. तर स्वागत सचिव जतीन भिलारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम माने तर आभार प्रकाश बेलोशे यांनी मानले.