उरुळी कांचन, (पुणे) : पुणे जिल्ह्यातील हवेली माध्यमिक शिक्षक संघाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाशी संलग्न, हवेली तालुका माध्यमिक शिक्षक संघ, हवेली तालुका शिक्षक लोकशाही आघाडी व हवेली तालुका माध्यमिक महिला शिक्षिका संघ यांची सोरतापवाडी (ता. हवेली) येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालय येथे शनिवारी (ता. १०) सहविचार सभा राज्याचे लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष जी. के. थोरात , पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले यांच्या सूचनेनुसार तसेच पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अशोक नाळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी हवेली तालुका माध्यमिक शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली
हवेली तालुका माध्यमिक शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये कार्याध्यक्षपदी महेश पवार, उपाध्यक्षपदी दिलीप थोपटे, सूर्यकांत क्षीरसागर, सहसचिव चेतन उशिरे, सतीश केकाण, सल्लागार प्रमोद चव्हाण, संपादक लालचंद कुंवर, कोषाध्यक्ष लक्ष्मण भालसिंग, खजिनदार अनिल चंद, श्रीरंग जाधव, विशाल भांडवलकर, आदींना निवडीचे पत्र देऊन त्यांना शाल, गुलाब पुष्प, श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सहविचार सभेला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब चोरघे, सचिव रंगनाथ कड, संचालक भिकाजी चौधरी उपस्थित होते. त्यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी हवेली माध्यमिक संघाकडून २१ शिक्षकांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्याचे ठरले. शिक्षक पुरस्कार निवडताना अनुभव, उपक्रमशील, विद्यार्थी प्रिय, प्रामाणिक कार्य तसेच सामाजिक कार्यात सहभाग असावा. यांचा विचार करून निवड करण्याचे सर्वानुमते ठरले आहे. दिवाळीनंतर गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. असे संघाचे अध्यक्ष रमेश विचारे, सचिव शरद चौधरी, कार्याध्यक्ष महेश पवार टी डी एफ चे अध्यक्ष पांडुरंग पवार, उपाध्यक्ष दिलीप थोपटे, सूर्यकांत क्षीरसागर, महिला अध्यक्षा वंदना चौधरी यांनी जाहीर केले.
दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब चोरगे म्हणाले, “शासनाने जवळजवळ १०-१२ वर्ष शिक्षकांची पदे भरलेली नाहीत. आम्ही वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करूनही ती भरली जात नाहीत. त्यामुळे शाळेमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांवर जादा भार पडत आहे. त्यामुळे संघाने शिक्षण आयुक्त, शिक्षण अधिकारी यांच्यापुढे समस्या मांडाव्यात.”
यावेळी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अशोक नाळे, मधुकर खरात, टीडीएफचे कार्याध्यक्ष महादेव पाटील, राजेंद्र बोधे जिल्हा प्रतिनिधी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सचिव शरद चौधरी, टीडीएफचे अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी केले. सभेचे नियोजन दिलीप थोपटे, वंदना चौधरी यांनी केले. प्राचार्य सुनील पडवळ आणि पर्यवेक्षक भारत आडकर यांनी सहकार्य केले. तर आभार संघाचे कार्याध्यक्ष महेश पवार यांनी मानले .