पुणे : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी असून, गणित आणि विज्ञान परीक्षेचा पेपर लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना यंदाही १५ मिनिटे अधिक देण्याचा निर्णय शालान्त मंडळाने घेतला आहे. अशी माहिती शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली आहे.
अधिक माहिती देताना भगीरथ शेट्ये म्हणाले कि, राष्ट्रीय सर्वेक्षणात गोव्यातील विद्यार्थी गणित विषयात मागे पडत असल्याचा निकष आला आहे. ही परीक्षा ही उत्तरपत्रिकेवर उत्तरे लिहिण्याची आणि गणिते सोडविण्याची आहे. त्यामुळे शालान्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. गणित व विज्ञानच्या पेपरासाठी दीड तास म्हणजे ९० मिनिटे वेळ दिला जात होता. मात्र आता १५ मिनिटे वेळ वाढवून ती वेळ १०५ मिनिटे केली आहे.
दरम्यान, दहावीच्या द्वितीय सत्र परीक्षा १ एप्रिलपासून सुरू होत आहेत. तर बारावीच्या १५ मार्चपासून सुरू होत आहेत. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापूर्वीच दहावीचा आणि बारावीचा निकाल जाहीर करण्याचा शालान्त मंडळाचा यंदा इरादा आहे. असेही शेट्ये यांनी सांगितले आहे.