परंडा : महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ शाळा पुरस्कार अभियान २०२१-२२ अंतर्गत ९१ टक्के गुण मिळवून येथील ग्लोबल विद्यालयाला फाईव्ह स्टार देऊन स्वच्छ विद्यालय जिल्हास्तरीय पुरस्कार बुधवार ( ता.२८ ) मिळाला आहे. आणि हा पुरस्कार गटशिक्षण अधिकारी ए. आर. खुळे यांनी ग्लोबलचे संस्थापक – अध्यक्ष गोरख मोरजकर व सचिव आशा मोरजकर यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार केला .
देशामध्ये २ ऑक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियान सुरू झालेले आहे . त्यानुसार सन २०१५ -१६ पासून देशभरातील सर्व शाळांसाठी स्वच्छ विद्यालय पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार ग्लोबल विद्यालयाने उस्मानाबाद जिल्ह्यामधून २०२१-२२ साठी नामनिर्देशन केले होते. स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी नामांकन केलेल्या ग्लोबल विद्यालयाची प्रथम तालुका स्तरावरून तपासणी करून पुढे शिफारस करण्यात आली होती.
त्यानंतर दि .२४ जुन २०२२ रोजी दुपारी १२:३० ते १२:५० यादरम्यान राज्यस्तरीय चार सदस्यीय समितीकडून ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमांतून तपासणी करण्यात आली. ऑनलाईन सादरीकरणामध्ये शाळेतील सांडपाणी तसेच पाणी पिण्यायोग्य असल्याचे प्रमाणपत्र, परिसर स्वच्छता, हात धुण्यासाठी वॉश बेसीन, शौचालयात नळाची व्यवस्था, पावसाचे पाणी साठविण्याची सोय, रॅम्प, लाईटची व्यवस्था, सोलार, विज रोधक, अग्निशामक तसेच मुलींच्या बाबतीत मासिक पाळीच्या कचऱ्याची सुरक्षित प्रक्रिया/विल्हेवाट लावण्याची व्यवस्था. अशा सर्व बाबीची तपासणी केली.
तपासणी दरम्यान समितीमधील सदस्यांकडून सर्व आवश्यक फोटो व प्रजेंटेशनची पहाणी करण्यात आली. या सर्व तपासणी नंतर ग्लोबल विद्यालयाला स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२ नुसार जिल्हा स्तरीय अवार्ड जाहीर करण्यात आला. या स्वच्छ शाळा पुरस्कारमध्ये ९१ टक्के मार्क मिळवून ग्लोबल विद्यालयाला फाईव्ह स्टार मिळाले .
गटशिक्षण अधिकारी ए. आर. खुळे, विस्तार अधिकारी एस. एम. संगमनेरकर, डी. एस निर्मळे, एस. एस. कदम व विषय साधन व्यक्ती एम. डी. जगताप यांच्या वतीने ग्लोबल विद्यालय येथे संस्थापक – अध्यक्ष गोरख मोरजकर, सचिव आशा मोरजकर यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार केला .