सुरेश घाडगे
परंडा : आयुष्य ज्ञानमय आणि कर्म सेवामय झाले की सारे जीवन प्रकाशमान होते. प्राचार्य डॉ. दीपा दिनेश सावळे ह्या विद्या व्यासंगात रमलेल्या ज्ञान यात्री आहेत. त्यांनी ग्रंथ लेखन, संशोधन आणि प्रशासन या क्षेत्रात आपल्या कार्यकर्तुत्वाच्या अक्षर मुद्रा उमटविल्या आहेत. त्यांच्या व सहकाऱ्यांचा सत्कार हा ज्ञानात्मक गुणवत्तेचा सार्थ गौरव आहे. असे प्रतिपादन साहित्यिक प्राचार्या डॉ. यशवंत पाटणे (सातारा) यांनी सोमवारी (ता. ०१) केले.
यावेळी प्राचार्य डॉ. अशोक मोहेकर, प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, प्राचार्य डॉ. वसंत सानप, माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत मोरे, प्रा. डॉ. ए. डी. जाधव, प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे ,श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव तथा निमंत्रक संजय निंबाळकर उपस्थित होते डॉ . सावळे यांनी लिहिलेल्या स्मृतीच्या झरोक्यातून शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय -विकासाची वाटचाल, माझा जीवन प्रवास व उस्मानाबाद जिल्ह्यातील धार्मिक स्थळे व देव देवता या तीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. सावळे यशोदीप गौरव ग्रंथाचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नुतन प्राचार्य डॉ . सुनिल जाधव यांचे स्वागत करण्यात आले.
डॉ. पाटणे पुढे म्हणाले कि, सध्याचा काळ हा संक्रमणाचा आहे. वाढता धर्म द्वेष, अतिरेकी चंगळवाद आणि मूल्यहीन राजकारणामुळे संस्कृतीचा आणि लोकशाही व्यवस्थेला तडे जात आहेत. तरुणांच्या पोटापाण्याचे प्रश्न बाजूला पडले आहेत. एकूण समाजाच्या विवेक बुद्धीला ग्लानी आली आहे. अशा काळात ध्येयवादी शिक्षकांनी समाजाला जागे करून सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली पाहिजे.
शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे . शिंदे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी श्री भवानी शिक्षण संस्थेच्या रूपाने ज्ञानाचे चैतन्य पीठ उभे केले. संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी महाविद्यालयाचा गुणात्मक आणि रचनात्मक विस्तार केला. गुणवत्तेची कदर असणारे शिक्षण महर्षीच सामान्य माणसातून माणिक मोत्यासारखे रत्ने निर्माण करतात गुणवत्तेचा कस हा जीवनातील कठीण आव्हाने स्वीकारताना लागतो. खडतर प्रवास अनुभवाने मिळविलेले यश हीच खरी गुणवत्ता असते.