लोणी काळभोर, (पुणे) : येथील एमआयटी, आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ राजबाग येथे ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे मेजर जनरल (निवृत्त) एन. व्ही. पांडे, आणि एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. सुनिता मंगेश कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
एमआयटी मॅनेटच्या विद्यार्थ्यांनी संचलन करत ध्वजाला मानवंदना दिली. तसेच एमआयटी एडीटी विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी देशभक्तिपर गीतांचे गायन करत ध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, मॅनेटचे प्राचार्य प्रा. अमोल आठले, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, डॉ. सुदर्शन सानप, यांच्यासह सर्व विभागाचे डीन, डायरेक्टर, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
निवृत्त मेजर एन. व्ही. पांडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट दर्जाचे कार्य करण्याचे धैर्य ठेवावे. मानवी कल्याणासाठी व समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. माझ्या देशात जे नाही, ते येथे निर्माण करण्याची ताकद युवकांमध्ये आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे मुल्य विद्यार्थ्यांनी विसरू नये.
डॉ. सुनिता मंगेश कराड म्हणाल्या की, देशसेवा हेच देशभक्तीचे कार्य समजून प्रयत्न करावे. भारताच्या परंपरेला आणि सांस्कृतिक वारसाला जिवंत ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहावे.