पुणेः व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्ज नोंदणीची मुदत संपल्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/बीटेक), अभियांत्रिकी थेट द्वितीय वर्ष, एमबीए आणि एमसीए या अभ्यासक्रमांचे प्रवेशाचे पुढील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यातील अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/बीटेक) पदवी अभ्यासक्रमाची पहिली यादी १४ ऑगस्टला जाहीर होणार आहे. तर, अंतरिम गुणवत्ता यादी ८ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.
अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/बीटेक) पदवी प्रवेशासाठी यंदा १ लाख ९२ हजार ३६० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांची ८ ऑगस्ट रोजी अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर ९ ते ११ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरायचे आहेत. तर, पहिली गुणवत्ता यादी १४ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. या वर्षी प्रवेशाच्या तीन फेऱ्या असून त्यातील दोन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या, तर शेवटची फेरी संस्थास्तरावर होईल. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख १३ सप्टेंबर आहे.