-संतोष पवार
पळसदेव : जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापन आणि सर्व माध्यमांच्या शाळांनी विद्यार्थी सुरक्षिततेबाबत योग्य ती उपाययोजना करण्याबाबतचे आदेश पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहेत. दि. 18 ऑक्टोबर 2024 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
या बैठकीत शालेय विद्यार्थी वाहतूक सुरक्षा शालेय परिवहन समिती आदींबाबत उपायोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी शासन नियमानुसार शालेय परिवहन समिती गठीत करून विद्यार्थी सुरक्षितता, वाहतूक नियमांचे पालन करणे, वाहतूक व्यवस्थेमधील सर्व कर्मचाऱ्यांचे वाहतूक परवाना चारित्र्य दाखले अद्ययावत ठेवणे, परिवहन समिती स्थापन करून त्याचे इतिवृत्त जतन करून ठेवणे, आदींबाबत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक नियमांची माहिती देणे, शाळांमध्ये आरएसपी पथकांची नेमणूक करणे, शालेयकामी दुचाकीवरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सक्तीने हेल्मेट वापरणे, विद्यार्थ्यांना हेल्मेटचे महत्व पटवून देणे, तसेच शाळांमध्ये Road safety awareness program राबवणे, आदींबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच सर्व शाळांनी परिवहन समितीच्या www.schoolbussafteypune.org वेबसाईटवर आपली माहिती अद्ययावतपणे भरण्याबाबतची कार्यवाही करण्याचे आदेशही शिक्षणाधिकारी कारेकर यांनी दिले आहेत.