पुणे : झील एज्यूकेशन सोसायटीच्या ज्ञानगंगा इंग्लिश माध्यम शाळेच्या विक्रमाची पताका आता विदेशातही फडकली आहे. नेपाळची राजधानी काठमांडू येथे DAV विद्यालयाने “आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन 2022’’चे आयोजन केले होते. त्यात ज्ञानगंगा इंग्लिश माध्यम शाळेने 3 पुरस्कार मिळवून आपला लौकिक ऊंचावला आहे.
आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी जगभरातून शाळांनी आपला सहभाग नोंदविला होता, तर संपूर्ण भारतातून केवळ ज्ञानगंगा शाळेने सहभाग नोंदविला होता. ज्ञानगंगा शाळेने ‘Multiple Landrover’ व ‘Smart Wheelchair’ या दोन संशोधनाची प्रस्तुती सादर केली होती. यापैकी ‘Multiple Landrover’ संशोधनास प्रथम पुरस्कार प्राप्त झाला असून, ‘Smart Wheelchair’ संशोधनास द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या प्रदर्शनासाठी शाळेने सौरभ देशपांडे, रोमित चव्हाण, ओंकार पाटील, आर्यन क्षीरसागर, यश शहा, अर्चित साने, अंश फारके व हर्षल टापरे या 8 उदयोन्मुख संशोधक विद्यार्थ्यांची टीम रवाना केली होती. याच प्रदर्शनात अचानक घेतलेल्या ‘आहे त्या क्षणी’ (On the Spot) संशोधन प्रकारात तिसरा क्रमांक मिळवल्याने विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांना प्रज्ञा चिकोडीकर व अपूर्वा पित्रे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यानिमित्त चिकोडीकर व पित्रे या शिक्षिकांचा ‘उत्कृष्ट मार्गदर्शिका’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी झालेल्या खास समारंभात ज्ञानगंगा इंग्लिश माध्यम शाळेच्या प्राचार्या रेणुका दत्ता यांचा ‘युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट अवॉर्ड’, ‘इंटरनॅशनल एजुकेशनल फ्रेंडशिप अवार्ड -२०२२’ व ‘सर्वोत्कृष्ट समन्वयिका’, तर सुप्रिया जमदाडे यांना ‘उत्कृष्ट समन्वयिका’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
झील एजुकेशन सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष एस. एम. काटकर, सचिव जयेश काटकर, सल्लागार प्रदीप खांदवे यांनी ही पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.