–संतोष पवार
पळसदेव : शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) साठी अर्ज भरण्याची मुदत नुसतीच संपली असून त्यासाठी भावी शिक्षकांमध्ये चुरस पाहायला मिळाली. मुदत संपेपर्यंत जवळपास 3 लाख उमेदवारांनी यासाठी नोंदणी केली. तर शुल्क भरण्यासाठी काही तांत्रिक अडचणी उद्भवलेल्या उमेदवारांना 3 ऑक्टोबरपर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी 30 ऑक्टोबर ही अर्ज नोंदणी करण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानुसार 3 लाख 32 हजार उमेदवारांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले होते. त्यापैकी 2 लाख 92 हजार 184 उमेदवारांनी अर्ज नोंदणी केली. तर 2 लाख 57 हजार 885 उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरणा पूर्ण करून अर्ज निश्चित केले आहेत. तर 34 हजार 299 उमेदवारांनी अद्याप परीक्षा शुल्क भरलेला नाही. अशा उमेदवारांसाठी 3 ऑक्टोबरपर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2024 साठी 10 नोव्हेंबर रोजी परीक्षाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 9 ते 30 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून अर्ज नोंदणीसाठी मुदत देण्यात आली होती. शुल्क भरण्याची मुदत संपल्यानंतर अंतिम परीक्षार्थी उमेदवारांची संख्या निश्चित होईल. त्यानंतर परीक्षा केंद्र, केंद्रसंचालक, पर्यवेक्षक नेमणूक करण्यासह परीक्षेच्या दृष्टिकोनातून नियोजन केले जाणार आहे.