-संतोष पवार
पळसदेव (पुणे) : शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. मुदतवाढीमुळे पालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील मुदत 5 ऑगस्ट रोजी संपली असून आता ही मुदत 8 ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती असल्यामुळे आरटीई 25 टक्के प्रवेशीत बालकांच्या पालकांना कागदपत्रे पडताळणी करिता घराबाहेर पडणे शक्य नसल्यामुळे आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी मुदतवाढ देणे आवश्यक असल्याचे दिसून येते. तरी याद्वारे आपणास कळविण्यात येते की, पुनश्चः 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
राज्यात RTE प्रवेशासाठी 9 हजार 217 शाळांमध्ये 1 लाख 5 हजार 242 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी राज्यातून 2 लाख 42 हजार 516 विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. त्यापैकी 93 हजार 9 विद्यार्थ्यांची लकी ड्रॉच्या माध्यमातून निवड झाली आहे. प्रवेशासाठी 93 हजार 9 विद्यार्थ्यांची निवड होऊन देखील केवळ 54 हजार 449 विद्यार्थ्यांचे आतापर्यंत प्रवेश कन्फर्म झाले आहेत. म्हणेजच निवड झालेल्यांपैकी तब्बल 38 हजार 560 पाल्यांचे अर्ज अजूनही कन्फर्म झालेले नाहीत. त्यामुळे RTE प्रवेशासाठी शिक्षण विभागाने 8 आगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.