संदीप टूले
Daund News दौंड : न्यू इंग्लिश स्कूल नानगाव (ता. दौंड) च्या २००६-२००७ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा तब्ब्ल १६ वर्षांनी एकत्र येत स्नेहमेळावा मेहेर रिट्रीट खुटबाव येथे पार पडला. १६ वर्षांनी विद्यार्थी भेटत असल्याने विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय करून दिला. त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्ज्वलन उपस्थित शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. (Daund News)
यावेळी शिक्षिका बोरकर म्हणाल्या की, खऱ्या अर्थाने आज मला माझ्या लेकी आणि लेक भेटले आहे. ‘गुरुविना शिष्य नाही व शिष्यविना गुरु नाही’. खूप दिवसानंतर तुम्हाला सर्वांना पाहून खूप आनंद झाला आहे. शिक्षक चौधरी म्हणाले की, खरे तर आमच्यासाठी हा सुखद धक्का आहे.
विशेष म्हणजे आमच्या बरोबर उपस्थितांमध्ये आमचे काही माजी विद्यार्थी मोठ्या पदावर गेले आहेत. अनेक दिवसांनी एकत्र आल्याचा आनंद आहे. सर्वांसाठी हा क्षण आनंदाचा अविस्मरणीय क्षण आहे. यापुढे दरवर्षी माजी विद्यार्थी मेळावा व्हावा असे वाटते.
शिक्षक कोळी म्हणाले की, एवढ्या दिवसानंतर सर्व विदयार्थ्यांना भेटून आनंद झाला. तसेच त्यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण स्पर्धा परीक्षेकडे जाण्याचा ओघ वाढवावा. तसेच शिक्षक धाईंजे यांनी दूरध्वनीवरून स्नेहमेळावा कार्यक्रमाला शुभेच्या दिल्या व सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले.
शाळेचे दिवंगत शिक्षक पाटील यांना सर्वांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्व जमलेल्या विद्यार्थ्यांनी मिळून उपस्थित शिक्षकांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओसिम पठाण यांनी केले तर सूत्रसंचालन मेघा कुंभार व दीपक पवार यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजन करणारे रोहन मोटे, अजय खळदकर, विकास पवार, विकास रासकर, सागर खळदकर, श्रीकांत ससाणे, महेश खळदकर, स्वप्नील साळुंके, श्रीकांत गुंड, विजय खळदकर, अर्चना कौले, सुप्रिया खराडे, सारिका खळदकर, गौरी रासकर, अभिजित रासकर, विशाल आखाडे, समीर पठाण, अनिता खराडे, उमेश परकाळे, अमोल शिंदे, निलेश खळदकर, प्रिया दिवेकर यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांचे आभार मानले. सर्वानी ‘वंदे मातरम’ राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता केली.