पुणे: एनटीएतर्फे (राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरण) देशभरातील विद्यापीठांतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संयुक्त विद्यापीठ प्रवेश परीक्षा 2024 ही परीक्षा 11 ते 28 मार्च या दरम्यान घेतली जाणार असून, या परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
संयुक्त विद्यापीठ -पीजी परीक्षेच्या नोंदणीबाबतची माहिती एनटीएने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. विद्यार्थ्यांना देशभरातील केंद्रीय विद्यापीठे, राज्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, खासगी विद्यापीठांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे सोपे व्हावे म्हणून सीयूईटी-पीजी ही संयुक्त प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी एनटीएकडे सोपवण्यात आली आहे. देशभरातील विविध शहरातील केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
एनटीएने दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी 24 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तसेच 25 जानेवारीपर्यंत शुल्क भरता येणार आहे. 7 मार्च रोजी परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रवेश परीक्षेसाठीची पात्रता, शुल्क आणि अन्य माहिती https://nta.ac.in/, https://pgcuet.samarth.ac.in/ या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.