नगर : मेहनत, जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य ठेवल्यास स्पर्धा परीक्षांमध्ये यश नक्की मिळतेच, हेच दाखवून दिले आहे अहमदनगर जिल्ह्यातील एका नवविवाहित जोडप्याने. सुरेश आणि मेघना चासकर या दांम्पत्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत एकाच वर्षी उत्तीर्ण झाले असून आता सार्वजनिक बांधकाम विभागात क्लास वन अधिकारी पदी निवड झाली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने सन २०१९ आणि २०२० मध्ये घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेत पती-पत्नी या दोन्ही वर्षी उत्तीर्ण झाले आहेत. या दोघांनीही सार्वजनिक बांधकाम विभागात क्लास वन अधिकारी पदाला गवसणी घातली. पती-पत्नीने एकाचवेळी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
मेघना यांचे मूळ गाव येसगाव (ता.कोपरगाव) असून त्यांच्या वडिलांचे नाव कैलास दरेकर व आईचे नाव जयश्री दरेकर आहे. तर सुरेश यांचे गाव सायाळा (ता. सिन्नर) असून कै. भास्कर रामभाऊ चासकर यांचे चिरंजीव आहेत. कोपरगाव येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून दोघांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
मेघना यानी के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदव्युत्तर शिक्षण घेतले. सुरेश व मेघना हे दोन्ही जण में २०२२ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. तत्पूर्वीच त्यांनी ही परीक्षा दिली होती.
दरम्यान, नोकरी व कार्यभार सांभाळून या दोघांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली होती. कुटुंबांचे पाठबळ व एकमेकांची साथ यामुळे त्यांच्या यशाची वाट सुकर झाल्याचे दोघांनी म्हटले आहे.