संतोष पवार
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्याचा इयत्ता पाचवीचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 24.91% तर इयत्ता आठवीचा शिष्यवृत्तीचा निकाल 15. 23% इतका लागला आहे. राज्य परीक्षा परिषदेमार्फत 18 फेब्रुवारी 2024 रोजी इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती.
इयत्ता पाचवीच्या परीक्षेसाठी 5 लाख 10 हजार 672 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.त्यातील 4 लाख 92 हजार 373 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले .त्यातील 1 लाख 22 हजार 636 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले असून शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची संख्या 16 हजार 691 एवढी आहे. त्याचप्रमाणे इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 3 लाख 81 हजार 588 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 3 लाख 68 हजार 543 विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. शिष्यवृत्तीसाठी 56 हजार 109 विद्यार्थी पात्र झाले असून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या 14 हजार 703 एवढी आहे.
परीक्षा परिषदेतर्फे 18 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पाचवीचा शिष्यवृत्ती परीक्षेचा तात्पुरता निकाल 30 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला होता. 30 एप्रिल ते 10 मे या कालावधीत गुण पडताळणी संदर्भातील अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्ज निकाली काढून अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आले आहे.
असा पहा निकाल..
परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यास अंतिम निकाल परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर वैयक्तिकरित्या स्वतःचा बैठक क्रमांक टाकून पाहता येईल. तसेच शाळेस त्यांच्या लॉगीनमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल एकत्रितपणे पाहता येईल. तथापि शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक त्याच्या बँक खात्याची व आधार क्रमांकाची माहिती भरल्याशिवाय पाहता / डाऊनलोड करता येणार नाही. परंतु, संकेतस्थळावरील गुणवत्ता यादीत त्याला स्वतःचा शिष्यवृत्ती संच प्रकार (अर्हता) पाहता येईल. असे राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ.
नंदकुमार बेडसे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.