संतोष पवार
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेसाठीच्या प्रवेशपत्रावरील जात प्रवर्गाच्या उल्लेखावर आक्षेप घेतला गेल्याने मंडळाने बारावीच्या विद्यार्थ्यांना २३ जानेवारीपासून नवीन प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी याबाबत प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
राज्य मंडळाने १० जानेवारीपासून बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहे. यंदा पहिल्यांदाच प्रवेशपत्रावर विद्यार्थ्याचा जात प्रवर्ग नमूद करण्यात आला होता. मात्र त्यावर आक्षेप घेण्यात आला. याबाबत लोकभावनेचा आदर करून मंडळ दिलगिरी व्यक्त करत आहे. प्रवेशपत्रांवरील जातीचा प्रवर्ग हा रकाना रद्द करण्यात येत आहे. नव्याने तयार केलेली प्रवेशपत्रे राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर डाउनलोड करण्यासाठी गुरुवारपासून ( दिनांक २३ जानेवारी २०२५) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांची परीक्षाविषयक सर्व इतर माहिती आहे तशीच राहील याची नोंद घ्यावी,’ असेही मंडळाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
‘दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावरील जातीचा प्रवर्ग हा रकाना रद्द करण्यात येत आहे. दहावीच्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने www. mahahsscboard. in या संकेतस्थळावर २० जानेवारी २०२५ रोजी दुपारी तीन वाजल्यापासून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. उर्वरित सूचना, तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षाविषयक माहितीमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही याची सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालकांनी नोंद घ्यावी ’ असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.