पुणे : राज्यात आता पुन्हा तिसरीपासून परिक्षा सुरू होणार आहे. असे सूतेवाच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केले आहे.
शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर हे पुण्यातील एका कार्यक्रमात आले होते. त्यावेळी वरील माहिती केसरकर यांनी दिली आहे. तसेच यासंदर्भात राज्यातील शिक्षण तज्ज्ञांची चर्चा सुरू असून त्यानंतरच अंतीम निर्णय घेतला जाणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
केसरकर म्हणाले की, आठवी पर्यंत परिक्षा घेतल्या जात नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवी पर्यंत त्यांना अनुत्तीर्ण करता येत नाही. त्यामुळे शिक्षणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. त्या पार्श्वभूमीवर इयत्ता तीसरी पासून पुन्हा परिक्षा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे.
दरम्यान, परिक्षा घेतली तरी आम्ही मुलांना अनुतिर्ण करणार असा त्याचा अर्थ काढण्यात येऊ नये. हा निर्णय केवळ चर्चेच्या पातळीवर असून या संदर्भात शिक्षण तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच अंतीम निर्णय घेतला जाईल. तसेच सर्वांना विश्वासात घेऊन शिक्षण विभागातील निर्णय घेण्यात येतील असेही केसरकर यांनी सांगितले आहे.