नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बुधवारी देशभरातील ‘डमी’ शाळांवर कारवाई केली. प्रामुख्याने २१ शाळांची संलग्नता रद्द करणे व ६ शाळांचा उच्च माध्यमिक ते माध्यमिक स्तरापर्यंत दर्जा कमी करण्यात आला आहे. ‘डमी’ प्रवेश देण्याची प्रथा शालेय शिक्षणाच्या मूळ उद्देशाच्या विपरित आहे, अशी प्रतिक्रिया सीबीएसईचे सचिव हिमांशू गुप्ता यांनी दिली.
सीबीएसईच्या अधिकाऱ्यांनी गेल्या सप्टेंबर महिन्यात राजस्थान व दिल्ली येथील विद्यालयांचे प्रासंगिक निरीक्षण केले. यावेळी तिथे अनेक उणिवा दिसून आल्या. ‘डमी’ किंवा विद्यार्थी उपस्थित नसतानाही प्रवेश दिला जात असल्याचे समोर आले. परंतु, ही प्रथा शालेय शिक्षणाच्या मूळ उद्देशांना हरताळ फासणारी आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळेच आम्ही ‘डमी’ शाळांवर कारवाईचा बडगा उगारला आहे, असे सीबीएसईचे सचिव हिमांशू गुप्ता यांनी ठणकावले.
‘डमी’ शाळेच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही ‘डमी’ विद्यालयांच्या प्रसाराला आळा घालण्याचा प्रयत्न करीत आहोत. यासाठी निर्णायक पावले उचलत आहोत. डमी किंवा गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश स्वीकारण्याच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन गुप्ता यांनी केले. प्रासंगिक निरीक्षणावेळी आढळलेल्या अनियमिततेसंबंधीत निरीक्षण समितीची टिप्पणी संबंधित विद्यालयांना कळवण्यात आली आहे.
विद्यालयांनी दिलेल्या उत्तरावर सीबीएसई मंडळाने विस्ताराने चौकशी केली. निरीक्षणात्मक निष्कर्ष व व्हिडीओग्राफीच्या पुराव्याच्या आधारे २१ विद्यालयांची संलग्नता रद्द करण्यात आली आहे. तसेच ६ विद्यालयांचा दर्जा उच्च माध्यमिक ते माध्यमिकपर्यंत घटवला आहे. यात, १६ शाळा दिल्लीतील आहेत, तर ५ शाळा राजस्थानातील कोचिंग केंद्र कोटा व सीकर जिल्ह्यातील आहेत, असे गुप्ता यांनी सांगितले.