-संतोष पवार
पळसदेव (पुणे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2025 मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी- बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रक संदर्भात सोशल मीडियावर अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावर आता राज्य मंडळाने अधिकृत प्रकटन प्रसिद्ध करून खुलासा जाहीर केला आहे.
राज्य मंडळाच्या परिपत्रकानुसार फेब्रु-मार्च 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छ.संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) लेखी परीक्षांच्या संभाव्य तारखांबाबत सूचना, हरकती मागविण्यात आल्या होत्या. तथापि काही संकेतस्थळावरून फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांची वेळापत्रके जाहीर करण्यात आली असल्याबाबतची बातमी सोशल मिडीयामार्फत प्रसारित करण्यात आली असल्याचे निदर्शनास आले. त्याअनुषंगाने जाहीर करण्यात येते की, फेब्रुवारी-मार्च 2025 च्या आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) लेखी परीक्षेची सविस्तर वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे सोशल मिडीयावरून प्रसिद्ध करण्यात आलेली फेब्रुवारी-मार्च 2025 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) लेखी परीक्षेची वेळापत्रके ग्राहय धरण्यात येवू नये.
फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इ.12वी व इ.10वी परीक्षांची सविस्तर विषयनिहाय वेळापत्रके स्वतंत्रपणे मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येतील, याची सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व अन्य घटक यांनी नोंद घ्यावी.
तसेच मंडळाचा लोगो अथवा नावाचा वापर करून परीक्षेबाबत चुकीची माहिती प्रसारित करून पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्यामध्ये संभ्रम निर्माण केल्यास त्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.