लहू चव्हाण
पाचगणी : एज्युकेशन टुडे या संस्थेने खाजगी शाळांचे गुणवत्ता मूल्यमापन केलेल्या सर्वेक्षणात गुणवत्तेवर मोहर उमटवत शैक्षणिक केंद्र असलेल्या पाचगणीतील बिलीमोरया बोर्डिंग हायस्कूलने देशात टाॅप टेन क्रमांक तर राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. बंगळूर येथील ताज हॉटेल येथे दि. ७ डिसेंबर रोजी एज्युकेशन टुडेचे प्रमुख अनिल शर्मा व विविध शाळांचे प्रमुख कंपन्यांचे सी.वो. यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांची आर्थिक प्रगती आणि शाळेचे भौतिक वातावरण अशा अनेक स्तरांवर शाळांचे सर्वेक्षण करत त्यांना गुणवत्तेचा दर्जा देणाऱ्या एज्युकेशन टुडे या संस्थेचे यंदाचे सर्वेक्षण नुकतेच पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणात देशातील तब्बल चार हजारहून अधिक इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांचा सहभाग होता. शाळांनी गुणवत्तेसाठी विविध सादरीकरणे संस्थेकडे दिली होती. या सादरीकरणांतून उत्तीर्ण झालेल्या शाळांना विविध प्रकारचे सर्वेक्षण, चाचण्या आणि पालकांची मते अशा अनेक पातळ्यांवर लढावे लागले.
यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या, शाळेतील सुविधा, पर्यावरण तसेच स्वच्छतेसारख्या विषयांबाबत केले जाणारे काम, शिक्षकांची गुणवत्ता आणि पालक तसेच विद्यार्थ्यांना शाळेबाबत वाटणाऱ्या अपेक्षा अशा अनेक विषायांवर हे सर्वेक्षण केले गेले. यांमध्ये सर्व स्तरांवर पाचगणी येथील बिलिमोरया हायस्कूलने बाजी मारली असून राज्यात द्वितीय स्थान मिळविले आहे. अंतिम स्तरावरील सर्व शाळांना मिळालेल्या गुणांतून ही निवड करण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक विशाल कानडे, शाळा कार्यालय प्रमुख चित्रा कांबळे, क्रिडा शिक्षक राहूल कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या यशाबद्दल बिलिमोरया हायस्कूलचे संस्थापक अरुणभाई गोराडीया,मॅनेजींग डायरेक्टर आदिती गोराडिया व पियूष कामदार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
यावेळी बोलतांना बिलिमोरया बोर्डिंग हायस्कूलच्या संचालिका आदिती गोराडिया म्हणाल्या संस्थेचे चेअरमन अरुण गोरिडिया यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या मेहनतीचा हा सन्मान असून यात संपूर्ण टीमचे यश आहे. या सन्मानामुळे अधिक चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.