मुंबई : नवा अभ्यासक्रम चालू वर्षापासूनच लागू करण्याचा हट्ट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सोडला असून २०२५ पासून नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम तातडीने लागू करण्याच्या विरोधात परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा मोठा विजय झाला असल्याचे चित्र आहे.
आयोगाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी देण्याचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) February 23, 2023
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर एमपीएससीने नवा अभ्यासक्रम तयार केला आहे. तसेच, परीक्षा पद्धतीतही बदल करण्यात आला आहे. हा बदललेला अभ्यासक्रम व वर्णनात्मक स्वरूपाची परीक्षा पद्धत या वर्षीपासून सुरू करण्याचा आयोगाचा मानस होता. मात्र त्यास विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केला. एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यासाठी पुण्यात गेल्या काही दिवसांपासून बेमुदत आंदोलन सुरू केलं होते. रात्रीच्या वेळेस हातात टॉर्च घेऊन विद्यार्थी रस्त्यावर ठाण मांडून होते.
आमचा अभ्यासक्रमाला विरोध नाही, फक्त तयारीसाठी वेळ हवा, अशी त्यांची मागणी होती. विरोधी पक्षांनीही विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: विद्यार्थ्यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली होती. काँग्रेसनेही याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे सरकार दरबारी तातडीनं हालचाली सुरू झाल्या. राज्य लोकसेवा आयोगाला पत्र पाठवण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. त्याचा परिणाम अखेर दिसून आले आहेत.