सुरेश घाडगे
परंडा : पुणे येथील अक्षर भरती संस्थेच्या वतीने पवारनगर (ता. परंडा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला तब्बल ३५० पुस्तके भेट स्वरुपात दिली आहेत.
ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना वाचनाची गोडी लागावी त्यांच्यामध्ये ती लहाणपणीच वृद्धींगत व्हावी. यासाठी गेल्या १४ वर्षापासून अक्षरभारती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याचे काम करीत आहे. वाचनाबरोबरच गरजु विद्यार्थ्यांना दरवर्षी स्कूल किट वाटप, संगणक साक्षरता वर्ग असे वेगवेगळे विद्यार्थी हिताचे उपक्रम या संस्थेमार्फत सुरु आहेत.
स्वतःची प्रगती करत करत आपल्या कुटुंबाची उन्नती करून सामाजिक बांधिलकी जोपासली जावी व समाजातील तळागाळातील होतकरू विद्यार्थ्यांना याचा लाभ व्हावा म्हणून कार्यरत असलेल्या या संस्थेने १४०० शाळांना सुसज्ज ग्रंथालये प्रदान केली आहेत.
दरम्यान, परंडा तालुक्यातील जवळपास ४० शाळांना अक्षरभारतीचे अध्यक्ष भानुदास आभाळे, राज्य समन्वयक गणेश वागस्कर , राज्य समन्वयक संतोष शेळके, संतोष रत्नपारखी , शिवाजी निम्हन,समीर दुडे यांनी भेट दिलेली आहेत. यावेळी पवारनगर शाळेचे शिक्षक विनोद सुरवसे यांनी अक्षरभारतीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.