पुणे : इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी वेळापत्रक जाहीर झाले असून, येत्या शुक्रवार म्हणजेच २४ मेपासून विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून अर्जाचा भाग १ भरावा लागणार आहे. यासोबतच कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणीदेखील सुरू होणार आहे.
अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या सदस्य सचिव डॉ. ज्योती परिहार यांनी अकरावीचे वेळापत्रक जाहीर केले. पुणे व पिंपरी-चिंचवड येथील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. http:11admission.org.in या पोर्टलवर अर्जनोंदणी शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होईल. पुढील दोन दिवस विद्यार्थ्यांना भाग १ ऑनलाइन तपासून पडताळणी करता येईल. दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना अर्ज भाग २ भरता येईल. भाग १ मध्ये विद्यार्थ्यांना प्राथमिक माहिती भरायची आहे. तसेच भाग २ मध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरायचे आहेत. दहावीच्या निकालानंतर कोटाअंतर्गत राखीव जागांवरील प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. अल्पसंख्याक कोटा ५० टक्के, इनहाउस कोटा १० टक्के आणि व्यवस्थापन कोट्यातून ५ टक्के प्रवेश दिले जाणार आहेत.
यानंतर कॅपअंतर्गत नियमित फेरी १ सुरू होईल. साधारण १० ते १५ दिवस ही प्रक्रिया सुरू राहील. पहिली फेरी पूर्ण झाल्यावर दुसरी, तिसरी आणि विशेष फेरी १ राबविण्यात येईल. विशेष फेरी २ मध्ये (एटीकेटी) प्रमाणे प्रवेश दिले जातील. आवश्यकता भासल्यास रिक्त जागेनुसार विशेष फेऱ्या राबविल्या जातील.