पुणे : बारामती येथील अंगणवाडी सेविका आज (दि. २०) अंगणवाडी सेविकांच्या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी भिगवण रस्त्यावर पंचायत समितीसमोर आपल्या विविध मागण्यांसाठी काही काळ रास्ता रोको आंदोलन केले.
बारामती शहरातील भिगवण चौक, शारदा प्रांगण येथून ‘मानधन नको, वेतन द्या’ अशा प्रकारच्या घोषणा देत मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील विविध चौकातून बारामती पंचायत समिती समोर मोर्चा आला. संतप्त अंगणवाडी सेविकांनी शासन व अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत भिगवण रस्ता अडविला. त्यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.
दरम्यान, पंचायत समिती अधिकाऱ्यांनी पंचायत समिती समोर आंदोलन करण्यास विरोध केल्याने महिलांनी रास्ता रोको केला. पोलीस अधिकाऱ्यांनी महिलांची समजूत काढताना रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.