दीपक खिलारे
इंदापूर : राज्यामध्ये सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. त्यांच्या न्याय मागण्या व प्रश्न शासन दरबारी मांडून निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे सोमवारी (ता.२७) दिली आहे.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने पुनम निंबाळकर यांचेसह इंदापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी हर्षवर्धन पाटील यांची इंदापूर येथे भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याशी संपर्क करून बैठक घेण्याची विनंती करू, असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील हे राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री असताना त्यांनी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवून मोठे सहकार्य केल्याची आठवण यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सांगितली.
अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात वाढ करावी, त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, ग्रॅज्युएटी मिळावी, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळावी, अंगणवाडी केंद्रांचे भाडे वाढवून मिळावे, बालकांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहारात रक्कमेंत वाढ करावी, मोबाईल देण्यात यावेत आदी मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांना देण्यात आले. या निवेदनावर इंदापूर तालुक्याचे वतीने पुनम निंबाळकर, शुभांगी शिंदे, सीमा खामगळ यांच्या सह्या आहेत.