हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) :
“गुरूंनी दिला ज्ञान रुपी वसा, आम्ही चालवू पुढे हा वारसा”
ह्या उक्तीना प्रतिसाद देत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या १९९६ च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी १०० झाडे दिली असून त्यातील सर्वच्या सर्व झाडे हि विद्यालयाच्या प्रांगणात लावण्यात आली. तसेच वृक्षारोपण करीत झाडांचे संवर्धन व संगोपन करण्याची हमी देखील या विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष के. डी. बापू कांचन, प्राचार्य भारत भोसले सर, बालाजी नर्सरीचे प्रमुख संतोष शितोळे, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष विकास म्हेत्रे, विद्यालयाचे उपस्थित शिक्षक व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. १९९६ मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विध्यार्थ्यांनी गेल्या वर्षी २०२१ मध्ये रौप्य महोत्सवी स्नेहसंमेलन आयोजित केले होते. त्या निमित्त केलेल्या संकल्पचा एक भाग म्हणून महात्मा गांधी विद्यालयात वृक्षरोपण केले.
आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेच्या ऋणात राहण्याच्या विचारसरणीतून आणि सामाजिक बांधिलकीतून या १९९५-९६ बॅचच्या विद्यार्थ्यांनी फक्त वार्षिक भेटीगाठीसाठी गेट टुगेदर न करता शाळेला आपण काहीतरी देणे लगतो या हेतूने हे वृक्षारोपण करण्यात आले. आपल्या शाळेला अशाच प्रकारची मदत इतर बॅचेसने सुद्धा करावी असे आवाहन या विद्यार्थ्यांनी केले.
यावेळी विकास म्हेत्रे यांनी आम्ही सर्वजण तुमच्या बॅच कडून प्रेरणा घेत असतो असे सांगितले तर प्रा. के डी कांचन यांनी बॅचच्या उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी रुपाली पवार यांनी प्रास्ताविक केले. माजी विद्यार्थी प्रविण दिवेकर व नारायण म्हेत्रे यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. तसेच समाजकार्य या बॅच कडून उत्तरोत्तर चालू ठेवण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रविण शितोळे यांनी केले होते. यावेळी माजी विद्यार्थी दीपक टिळेकर, दिपाली फडतरे, अमित कोलते, महेंद्र धाउत्रे, नीलराजे शिर्के, संदीप तात्या कांचन, गणेश कांचन, योगेश कांचन, तुषार रानवडे, राहुल ननावरे, प्रशांत शितोळे, हरीश वायकर, वसंत कांचन उपस्थित होते. सूत्रसंचालन विशाल ननावरे व मेघा पुणेकर यांनी केले. तर आभार सचिन भोसले यांनी मानले.
दरम्यान, याबाबत संदीप तात्या कांचन म्हणाले, “मी सुद्धा या शाळेचा विद्यार्थी असून सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांनी शाळा सबलीकरण करण्यासाठी सकारात्मक योगदान द्यावे. तसेच या शाळेत शिक्षण घेतल्याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे.”