पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा शुक्रवारी (ता. १५ ) नियमीतपणे सुरु राहतील असे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तर जिल्हा परिषद शाळा या दोन दिवस बंदच राहणार आहेत. राज्यात गुरुवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याचं चित्र आहे. पुणे जिल्ह्यात रेड तर शहरात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
मुसळधार पाऊस असताना विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचताना अनेक समस्या येत आहेत. स्कूलबस, व्हॅन विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आणि शाळा सुटल्यानंतर घरी सोडण्यासाठी वेळ लागत आहे. अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना कोणताही फटका बसू नये. यासाठी पुणे महापालिकेने शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला होता. प्रादेशिक हवामान अंदाज केंद्र, पुणे यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार दिनांक १४ आणि १५ जुलै या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीमुळे रेड अलर्टचा इशारा दिला आहे.
पुणे जिल्ह्यात झालेली व होणारी अतिवृष्टी पाहता सदर अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी आणि पालक यांच्यावर यांना होवू नये याकरीता पुणे जिल्ह्यातील (इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर व पुरंदर हे तालुके वगळून) इतर सर्व तालुक्यातील इयत्ता १२ वी पर्यंतच्या (प्री स्कुल, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक) सर्व शाळांना दिनांक १४/०७/२०२२ ते शनिवार, दिनांक १६/०७/२०२२ पर्यंत सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
दरम्यान इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर व पुरंदर हे तालुके वगळून हा आदेश दिला असून तेथील शाळा सुरू राहणार आहेत. तर पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्व मनपा व खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळा उद्या दिनांक १५ जुलै पासून नियमितपणे सुरु राहतील असे सांगितले आहे.