-संतोष पवार
पळसदेव : शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणार्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांसाठी सीईटी सेलमार्फत ‘नॉन कॅप’द्वारे प्रवेशासाठी (Non cap Admission) 23 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इंजिनिअरिंग, एमबीए, आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमासाठी राबविणाऱ्या महाराष्ट्रातील शासकीय, शासकीय अनुदानित, विद्यापीठ संचलित व खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी ही प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण (एआयसीटीई) तंत्रशिक्षणांतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष लॅटरल एन्ट्री प्रवेशाची अंतिम मुदत जवळपास एक महिन्यांनी वाढविली आहे. परिणामी, राज्यातील विद्यार्थ्यांनाही रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश घेता यावा, यासाठी सीईटी सेलने प्रवेशांना मुदतवाढ दिली आहे. त्यातून संस्थात्मकस्तरावर आणि कॅप फेरीनंतर रिक्त राहिलेल्या प्रथम आणि द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासह, एमटेक आणि एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता 23 ऑक्टोबरपर्यंत राबविली जाणार आहे. सीईटी सेलकडून या अभ्यासक्रमांच्या संस्थात्मकस्तरावरील प्रवेशासाठी नोंदणीला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे.
यात एमआर्च आणि बीआर्च अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 21 ऑक्टोबरपर्यंत दुपारी 1 वाजेपर्यंत नोंदणी सुरू ठेवली जाणार आहे. तर कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज निश्चिती 21 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. राज्यात सद्यःस्थितीत इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या 23 हजार 200 जागा रिक्त आहेत. यामध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि त्या संलग्न अभ्यासक्रमाच्या जवळपास 3 हजार 900 जागांचा समावेश आहे