एकनाथ शिंदे (शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणीकंद, ता.हवेली ,जि.पुणे)
लोणीकंद : मराठी शाळांमधून मराठी भाषेला समृद्धी आली. लहान पणापासून अक्षरांची ओळख झाली. त्यातून मराठी भाषा समृद्ध होत गेली. या भाषेबरोबर इतर भाषांच्या अवलोकनाने वेगवेगळ्या क्षेत्रात नाव लौकीक मिळवणाऱ्या व्यक्ती आपल्याला पहावयास मिळतात. त्या
व्यक्तिंनी शासकीय मराठी शाळेतून आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा गिरवला आहे. त्यामुळे त्या व्यक्ती समाजात चमकताना दिसतात.
अनेक वेळा वेगळ्या भाषेचे ज्ञान मिळवल्याने त्यांच्यात समृद्धी प्राप्त झाली असेल, पण आपल्या मातृभाषेला त्यांनी नेहमीच दर्जा दिल्याचे पहावयास मिळते. त्यांनी केलेल्या परिश्रमामुळे त्यांना यशस्विता मिळाली असेलही. मात्र त्या पाठोपाठ आपल्या मराठी भाषेला देखील त्यांनी
वेगळा दर्जा मिळवून दिल्याचे समजते. आज परदेशातही मराठी माणूस वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकीक मिळवत आहे. त्यासाठी आपनही या मराठी भाषेला राजभाषा म्हणून गौरविले पाहिजे.
प्रत्येक गावात आता ग्रंथालये स्थापन करण्यात आली आहेत. त्यातून मराठी भाषातील पुस्तकांचे वाचन होऊ लागले आहे. पण त्यातून किती प्रमाणात पुस्तकांचे वाचन होते हे देखील अभ्यास करण्याची गोष्ट आहे. खरे तर
प्राथमिक शिक्षणापासून मराठीचे ज्ञान मिळण्याचे ठिकाण हे शाळा असते. त्यासाठी प्रत्येक शाळांमध्ये मराठीला दर्जा मिळवून देण्यासाठी समृद्ध ग्रंथालय होणे गरजेचे आहे.
‘शाळा तेथे ग्रंथालय’ अशा योजना शाळा नेहमीच उपक्रमात राबवित असतात. त्यातून शाळांमध्ये
ग्रंथालय स्थापन होत असतील. त्यासाठी वेगळी यंत्रणा देखील राबवली गेली असेल. मात्र किती प्रमाण भाषा समृद्धीसाठी उपक्रम राबविले गेले हे पहाणे गरजेचे आहे. काही शाळा सुट्टीत देखील पुस्तके खुली करून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी. यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे मुलांमध्ये गुणवत्ता वाढीस लागल्याचे दिसून आले आहे.
मराठीला राजभाषा म्हणून गौरविण्याचे असेल तर प्रत्येक शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवून मराठीचा गौरव केला पाहिजे. एक दिवसाचा हा गौरव शाळांमधून वर्षभर राबविला गेला तर भविष्यातील पिढी देखील मराठीला गौरविल्याशिवाय राहणार नाही.
शब्दांकन – युनुस तांबोळी